अलवार टेकूनी ओठ वेणूवरी ,कान्हा फुंकर मारी
मला वाटते व्हावे मी ही कान्हाची बासुरी
श्वास त्याचा भिनवुन देही असे सूर छेडावे
प्रीतीच्या रंगात रंगुनी अवघे गोकुळ गावे
राधा कृष्ण कृष्ण कृष्ण ।।धृ ।।
नाव तुझे ग येते राधे माझ्या नावाआधी
कृष्णाच्या मनी वसते राधा ,तुज गोष्ट ना कळली साधी
बासुरीतूनी माझ्या सखे ग गीत तुझे मी गातो
श्वासांच्या सुरावटीवर नाव तुझे मी घेतो
राधा कृष्ण कृष्ण कृष्ण ।।1 ।।
अनुरेणुतुनी कृष्णची वाहे ,कृष्णची राहे अंतरी
जन्ममरणाचे भोग चुकवितो, जाता शरण मुरारी
तुझ्या प्रीतीचे वेड ना साधे ,अवघे जीवन वाहिले
कृष्ण कृष्ण म्हणत न कळले मीच कृष्ण जाहले
राधा कृष्ण कृष्ण कृष्ण ।।2।।